शाळेतील विद्यार्थी फरशी पुसत असल्याचे काढले होते छायाचित्र
आझमगड – शाळेमधील काही मुले शाळेतील फरशी पुसत असल्याचे छायाचित्र काढणाऱ्या पत्रकाराला खंडणीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आझमगड जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सोमवारी दिले आहेत.
खंडणीखोरी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास अडथळा आणण्याच्या खोट्या आरोपाखाली या पत्रकाराला अटक करण्यात आली होती, असा आरोप सहकारी पत्रकार सुधीर सिंग यांनी इतर पत्रकारांसह जिल्हाधिकारी एन. पी. सिंह यांची भेट घेऊन त्यांना बेकायदेशीर अटकेची माहिती दिली.
यावर आझमगडचे डीएम एन पी सिंह म्हणाले की, पत्रकारांवर अन्याय होणार नाही. आम्ही या प्रकरणात लक्ष घालू तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करू असे अश्वासन दिले आहे. या विषयी माहिती देताना पत्रकार सुधीर सिंग यांनी सांगितले की, शाळेमधील विद्यार्थ्यांना फरशी पुसण्यास सांगण्यात आले होते.
याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पत्रकार संतोष जैस्वाल शाळेत गेले आणि त्यांनी याचे फोटो काढले आणि पोलिसांना बोलावत शाळेवर कारवाई करण्यास सांगितले.
यानंतर पोलिसांनी जैस्वाल आणि शाळेचे मुख्याध्यापक राध्येशाम यादव यांना पोलिस ठाण्यात नेले. मात्र, यावेळी मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरुन जैस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.