श्रद्धांजली: जेठमलानींचे “कायदे’मय आयुष्य

हेमंत देसाई

आताच्या पाकिस्तानातील सिंधमध्ये कायद्याची पदवी मिळवून तेव्हाच वकिलीचा परवाना मिळवण्यासाठी झुंज देणारा हा माणूस. फाळणीनंतर प्रचंड दंगे झाले आणि अशा वातावरणात जे असंख्य लोक भारतात येऊन निर्वासितांच्या छावणीत राहिले, त्यांत जेठमलानीही होते.

दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावेळी केजरीवाल यांच्या बाजूने राम जेठमलानी न्यायालयात उभे राहिले होते. वास्तविक एकेकाळी जेठमलानी हे भाजपच्या संस्थापकांपैकी एक होते. परंतु त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांना पक्षाबाहेर पडावे लागले. आता जेटलीही हयात नाहीत आणि जेठमलानीदेखील…

जेठमलानी हे सर्वाधिक मानधन घेणारे वकील होते. फौजदारी कायद्याची सांगड घटनेतील मूलभूत हक्‍कांसोबत कशी घातली जाते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. मूलभूत अधिकारांचा संबंध आरोपींच्या हक्‍कांशी जोडण्याची व फौजदारी कायद्याचे घटनात्मक कायद्यात रूपांतर करण्याची ऐतिहासिक कामगिरी जेठमलानी यांनी केली. सामान्य माणसाला वाटते की, चोर-बदमाशांचे वकीलपत्र वकील मुळात घेतातच कशाला? परंतु ज्याचे वकीलपत्र घेतो, तो निर्दोषच आहे अशी धारणा ठेवून काम करणे, हेच कायदेपंडिताचे मूलभूत कर्तव्य आहे, अशी जेठमलानी यांची धारणा होती. ते दिवसाला अठरा-अठरा तास काम करत. भारतातील व अन्य प्रगत देशांतील कायद्याचा सातत्याने तुलनात्मक अभ्यास ते करत. त्यांचे वाचन अफाट होते आणि पुस्तकातील महत्त्वाच्या संदर्भांवर ते खुणा करत असत. अमुक व्यक्‍ती गुन्हेगार आहे की नाही, हे ठरवायचे काम न्यायाधीशाचे असते, वकिलाचे नव्हे, असे ते म्हणत.

जेठमलानींच्या धैर्याबद्दलचा एक किस्सा मला आठवतो. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत दंगली झाल्या, तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे एक शांततापथक दंगलग्रस्त भागात गेले होते. दंगलीची झळ पोहोचलेल्या शिखांना मदत करण्यासाठीच हे पथक गेले होते. परंतु एका ठिकाणी एक हिंसक जमाव शिखांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. हे पथक शिखांसाठी धावून आले आहे, हे पाहताच तो जमाव या पथकावर लाठ्याकाठ्यांनी आक्रमण करण्याची तयारी करू लागला. त्यावेळी खासदार असलेले जेठमलानी एकदम जमावाच्या मध्यभागी जाऊन जमिनीवर बसले आणि उद्‌गारले, “या पथकातील कुणावरही हल्ला करायचा असल्यास, प्रथम तो माझ्यावर करावा.’ त्याबरोबर जमाव शांत झाला. न्या. व्ही. रामस्वामी यांच्याविरुद्ध 1990 मध्ये महाभियोग चालवला जाणार होता, तेव्हा प्रशांत भूषण, राम जेठमलानी प्रभृतींनी न्यायालयीन उत्तरदायित्वविषयक समिती स्थापन केली. न्यायालयातील भ्रष्टाचार वगैरेविषयक प्रश्‍न हाताळणे, हा तिचा उद्देश होता. भ्रष्ट न्यायाधीशांविरुद्ध हल्लाबोल करण्यास जेठमलानी कचरत नसत.

निर्वासितांच्या छावणीत असताना, त्यांच्या खिशात दोन पैसेही नव्हते. त्यानंतर ते मुंबईला आले आणि वकिली करू लागले. 1959 साली नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार, या प्रसिद्ध खटल्यात ते सरकारी वकील सी. एम. त्रिवेदी यांचे सहायक म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

ते एक मोठे रंगतदार व्यक्‍तिमत्त्व होते. वयाच्या 93 पर्यंत वकील म्हणून ते सक्रिय होते. तोपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्‍ती पहिल्यासारखी होती. हर्षद मेहता, केतन मेहता यांचे किल्ले त्यांनीच लढवले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचे खटले त्यांनीच लढवले. हवाला केसमध्ये तेच वकील होते. पण मला आठवतो तो अंतुले यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात त्यांनी केलेला युक्‍तिवाद आणि लढवलेले बुद्धिचातुर्य. ते अत्यंत आक्रमकपणे कायदेशीर युक्‍तिवाद करत असत. त्यांचा अनुभव प्रचंड होता आणि व्यासंगही. आणीबाणीच्या वेळी ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कॅनडात पळाले. भाजपने त्यांना तिकीट दिले आणि त्याच भाजपचे शीर्षस्थ नेते वाजपेयींविरुद्ध जेठमलानींनी निवडणूक लढवली..अगदी सोहराबुद्दीन प्रकरणातील अमित शहा यांची केसही त्यांनी लढवली. नंतर मात्र मोदी व शहा यांच्याविरुद्ध त्यांनी तुफानी टीकास्त्र सोडले. कर्नाटकात गेल्यावर्षी राज्यपालांनी ज्याप्रकारे येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदी बसवले, त्याविरुद्ध जेठमलानी कोर्टात गेले.

अनेक वर्षांपूर्वी जेठमलानींनी भारत मुक्‍ती मोर्चा व नंतर पवित्र हिंदुस्तान कझागम हे राजकीय पक्ष व संघटना स्थापन केल्या होत्या. जेठमलानी कधी कोणता पवित्रा घेतील हे सांगता येत नसे. तसे ते अनप्रेडिक्‍टेबल होतेच. परंतु धर्मांधतेची बाजू त्यांनी कधीच घेतली नाही. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत जेठमलानींनी वायव्य मुंबईतून तत्कालीन केंद्रीय कायदामंत्री एच. आर. गोखले यांचा पराभव केला. त्याच जागेवरून 1980 साली त्यांनी पुन्हा विजय मिळवला. परंतु 1984 साली सुनील दत्त यांनी त्यांचा तेथून पराभव केला.

कॉंग्रेसविरोधी राजकारणामुळेच जेठमलानींना राज्यसभेच्या सहा टर्म्स मिळाल्या. ते शीघ्रकोपी होते. परंतु कपिल सिब्बल असो वा प्रशांत भूषण; अशा अनेकांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले. जेठमलानींनी अनेक केसेस जिंकल्या. परंतु संजय दत्तला जामीन मिळवून देण्यात त्यांना वारंवार अपयश येत होते. एक दिवस ते सिब्बल यांचा हात हातात घेऊन त्यांना म्हणाले की, संजयबाबत मी नशीबवान ठरलेलो नाही. तेव्हा माझ्याऐवजी तू ती केस लढ. त्यानंतर संजयच्या बचावासाठी सिब्बल रिंगणात उतरले.

कोणाचाही मुलाहिजा न ठेवता स्वतःला पटेल तेच रोखठोकपणे बोलणाऱ्या व्यक्‍ती कमी होत चालल्या आहेत. एकमेकांच्या पाठी बोलणाऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. दिसेल त्याची चमचेगिरी करण्याच्या या युगात राम जेठमलानींसारख्या तोफा क्वचितच दिसतात. ही तोफ आता शांत झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×