पुणे : शहरात करोनाच्या गंभीर रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रूग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने अनेक पुणेकरांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक आपल्या वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी 5 लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत.
त्यासाठी सर्व नगरसेवकांना खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे तसेच महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी पत्र पाठविले आहे. सुमारे 2 कोटींचा हा निधी असून त्यातून तब्बल 100 ऑक्सिजन बेड उभारणे प्रशासनास शक्य होणार आहे.
शहरात करोनाच्या रूग्णांचा आकडा दिवसें दिवस वाढतच आहे. अशा स्थितीत शहरात अनेक रूग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी अनेक रूग्ण उपचाराविनाच शहरात दगावत आहेत. तर खासगी हॉस्पीटलचे बेडही संपले असून पुढील महिन्याभरात शहरासाठी सुमारे सात ते साडेसात हजार ऑक्सिजबेडची गरज असणार आहे. ही बाब लक्षात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांशी या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच चर्चा केली होती.
महापालिका आयुक्तांनीही त्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे या तीनही पदाधिकाऱ्यांकडून तातडीनं सर्व नगरसेवकांना पत्र पाठविण्यात आले असून अंदाजपत्रकातील कोणत्या कामाचा निधी द्यायचा आहे त्याच्या बजेट हेडची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहरावर करोनाचे संकट असल्याने महापालिका प्रशासनानेच विकासकामांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, केवळ अत्यावश्यक कामेच केली जाणार आहेत. तर, शहरासाठी सद्यस्थितीत नागरिकांचा जीव वाचने महत्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.