खाद्यतेलाच्या फोडणीला महागाईचा तडका

खाद्यतेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर ः गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन  – राज्यासह देशात धुमाकूळ घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यातच पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात जीवनावश्‍यक वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

तसेच तेलाचे दरही चांगलेच भडकले आहेत. यामुळे गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दररोज लागणारा किराणा माल, भाजीपाला, फळे यांचे दर दुपटीने वाढल्याने पूर्व हवेलीतील ग्राहकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.

रोजच्या जीवनात वापरली जाणारी भाजी 50 ते 60 रुपये किलो दराने मिळत आहे. फ्लॉवर, लिंबू, वाटाणा, बटाटा, टोमॅटो या सर्वांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

डाळींपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने पूर्व हवेलीतील सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दररोजच्या आहारात खाद्यतेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.

आपआपल्या आवडीनुसार पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, करडई तेल, स्वयंपाक घरात वापरले जाते. मात्र तेलाचे भाव वाढल्याने घरातील भाज्यांना तडका देणे गृहिणींना महाग
झाले आहे.

करोना संसर्गामुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे आर्थिक टंचाईला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे डिझेल, पेट्रोल, गॅस, डाळी आदींचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

करोनाचा सामना करताना सर्व सामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. करोनाने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सलग दुसऱ्या वर्षी सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

दरम्यान, लोणी काळभोर, उरुळी कांचनसारख्या मोठ्या बाजारपेठेत आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी भाजी विक्रीसाठी येत असतात.

मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधामुळे मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्याने किराणा माल, भाजी, फळे यांचेच दर वाढत चालल्याचे चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला तसेच फळांची वाढ होत नसल्याने आवक कमी होत आहे.

खाद्यतेलांचे दर लिटरमध्ये
सूर्यफूल120 ते 135
करडई160 ते 170
शेंगदाणे140 ते 155
मोहरी150 ते 160
सोयाबीन110 ते 124
पामतेल100 ते 115
तीळाचे तेल170 ते 180

करोनाचा प्रादुर्भाव आजही असून, याचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यातच किराणा, फळे व भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याचे दर कमी होण्याची गरज आहे.
-मीनाक्षी शिंदे, गृहिणी उरुळी कांचन

सध्या खाद्यतेलाच्या महागाईने ग्राहक भाजी तसेच खाद्यपदार्थ बनवून देताना नागरिक भाव विचारतात, मात्र खाण्याच्या ऑर्डर देण्यासाठी माघारी येत नाहीत. सर्वसामान्य जनतेचा शासनाने विचार करून अंमलबजावणी करावी.
– गफूर शेख, केटरर्स लोणी काळभोर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.