शिक्रापूर -येथे मुंबईहून आलेल्या आणि होमक्वारंटाइन केलेल्या एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने शिक्रापुरातील औरा सिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.
तर बाधित व्यक्ती ज्या सदनिकेमध्ये राहत होती, त्या सदनिकेमधील चार जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शिक्रापूर येथील औरा सिटी या ठिकाणी मुंबईहून एक व्यक्ती त्याच्या बहिणीकडे दि. 27 मे रोजी आलेला होता.
यावेळी त्याला मुंबईहून आलेला असल्यामुळे क्वारंटाइन करण्यात आलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये त्याला काही लक्षणे जाणवू लागल्याने त्याने एका खासगी संस्थेमध्ये करोना तपासणी केली असता त्याचअहवाल बुधवारी (दि. 3) पॉझिटिव्ह आला असल्यामुळे त्याला पुण्यात हलविले आहे.
तर सोसायटीत ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी करण्यात आली असून आरोग्य विभागाच्या वतीने या सोसायटीमध्ये सर्व्हे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी देखील या सोसायटीमध्ये एक महिला बाधित आढळून आली होती.