पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरातील करोना बाधित संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. त्यामध्ये स्वॅब तपासणीतील 1 हजार 144 जणांचे, तर रॅपिड अँटिजेन तपासणीत 909 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत 59 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर-37, तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील 22 जणांचा समावेश आहे.
दोन दिवसांपासून सक्रिय बाधितांची संख्या वाढली असून, मृत्यूच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. सोमवारी (दि.7) दिवसभरात 3 हजार 354 संशयिताची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 4 लाख 94 हजार 771 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 1 लाख 7 हजार 958 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात बाधित सापडण्याचे प्रमाण 21.82 टक्के आहे.
आतापर्यंत करोनामुळे 2 हजार 549 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 1 हजार 639 जण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत 88 हजार 579 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरात सध्या 16 हजार 830 बाधित सक्रिय असून, त्यातील 912 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 480 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे, तर 432 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.