एकाचा मृत्यू; बाधितांची संख्या 2722 वर
पिंपरी – शहरात आज 163 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 157 जणांचा तर शहराबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2722 वर पोहोचली असून मृतांची संख्या 71 वर पोहोचली आहे.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. शहरातील बाधितांमध्ये 81 पुरुषांचा आणि 76 महिलांचा समावेश आहे. शहराबाहेरील रुग्णांमध्ये 3 पुरुषांचा आणि 3 महिलांचा समावेश आहे. आजचे बाधित रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. तर शहराबाहेरील रुग्ण हे येरवडा पुणे, देहूरोड येथील रहिवासी आहेत.
शहरातील विशालनगर, पिंपरी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मयतांची संख्या 44 तर शहराबाहेरील 27 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मयतांची संख्या 71 झाली आहे. आतापर्यंत शहरातील 1640 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 164 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 16925 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 13517 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.