चंदीगड – पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारत व श्रीलंका संघ सोमवारी मोहालीत दाखल झाले. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सरावालाही प्रारंभ केला. त्यातच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या कसोटीद्वारे आपल्या कारकीर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळणार असून त्यानेही सहकारी खेळाडूंसह नेटमध्ये कसून सराव केला.
श्रीलंकेविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंनी मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये सराव सुरू केला. येत्या शुक्रवारपासून या कसोटीला प्रारंभ होणार आहे.
कोहलीसह यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, हनुमा विहारी, जयंत यादव, उमेश यादव, केएस भरत, सौरभ कुमार आणि रवीचंद्रन अश्विनही येथे दाखल झाले आहेत. गेल्या जवळपास दोन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून शतकी खेळी झालेली नसून या शंभराव्या कसोटीत तो ही कसर भरून काढेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
पंजाब क्रिकेट संघटनेने कोहलीच्या या संस्मरणिय कसोटीसाठी जय्यत तयारी केली असून कोहलीचा सराव करतानाचा व्हिडीओही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.