मुंबई – जमीन खरेदी प्रकरणात अटकेची शक्यता असल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याने अटकपूर्व जामीनसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला असून सत्र न्यायालय उद्या, मंगळवारी आपला निकाल जाहीर करणार आहे.
या याचिकेवर न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर सुनावणी पार पडली. नील यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. मात्र असं असलं तरी त्यांच्याविरोधातील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. यामुळे त्यांच्याविरोधीत कठोर कारवाई करण्याच्या 72 तास आधी नोटीस देण्यात द्यावी, अशी मागणी सोमय्या यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अशोक मुंदरगी यांनी केली.
यावर नील यांच्या विरोधात गुन्हाच दाखल करण्यात आला नसल्यामुळे तसं कोणतेही आश्वासन देता येणार नाही, असे राज्य सरकारकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आले. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून तो मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.