लंडन – भारताचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर आता रविवारपासून खेळाडूंच्या सरावालाही सुरुवात होणार आहे. येत्या 24 जूनपासून सुरू होत असलेल्या सराव सामन्याने या दौऱ्याला प्रारंभ होत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा शनिवारी संघात दाखल होणार असून माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराहसह सर्व खेळाडू येथे दाखल झाले आहेत.
एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ एक सराव सामना खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या दौऱ्यात एक कसोटी, 3 टी-20 व 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा पाचवी कसोटी भारतीय संघातील खेळाडूंना करोना झाल्याने स्थगित करण्यात आली होती.
या दौऱ्याची सुरुवात त्याच स्थगित झालेल्या पाचव्या कसोटीने होणार आहे. भारतीय संघ या कसोटी मालिकेत 2-1 असा आघाडीवर असून ही कसोटी जिंकली तर भारतीय संघ 2007 सालानंतर येथे प्रथमच कसोटी मालिका जिंकणार आहे. ही कसोटी बर्मिंगहॅमला होत आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक :
24 ते 27 जून : सराव सामना
1 ते 5 जुलै : पाचवा कसोटी सामना, बर्मिंगहॅम
7 जुलै : पहिली टी-20, साउदम्पटन
9 जुलै : दुसरी टी-20, बर्मिंगहॅम
10 जुलै : तिसरी टी-20, नॉटिंगहॅम12 जुलै : पहिला एकदिवसीय सामना, द ओव्हल
14 जुलै : दुसरा एकदिवसीय सामना, लॉर्डस
17 जुलै : तिसरा एकदिवसीय सामना, मॅंचेस्टर
भारताचा कसोटी संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, महंमद शमी, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.