पुणे – भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याने पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात वेगवान अर्धशतक फटकावले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पंधरावा क्रिकेटपटू ठरला.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कृणालने 26 चेंडूंत अर्धशतक ठोकले. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्या डावात कृणाल नाबाद राहिला. त्याने 31 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. या खेळीदरम्यान कृणालने लोकेश राहुलच्या साथीत सहाव्या गड्यासाठी 61 चेंडूंत 112 धावांची भागीदारी केली.
भारताकडून एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात अर्धशतक ठोकणारा कृणाल 15 वा फलंदाज ठरला. कृणालने न्यूझीलंडच्या जॉन मॉरिस यांचा विक्रम मोडला. 1990 मध्ये मॉरिस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना 35 चेंडूत अर्धशतक केले होते. संघाचा डाव संपल्यानंतर कृणालने आपला भाऊ हार्दिकला आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कृणालने आपली खेळी वडिलांना समर्पित केली. यंदाच्याच वर्षी जानेवारीत त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. या सामन्यात कृणालला हार्दिक याच्याच हस्ते पदार्पण केल्याबद्दल इंडिया कॅप प्रदान करण्यात आली.