हैदराबाद :- दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवित भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता टी-20 मालिकेतील आज होणातऱ्या तिसरा आणि निर्णायक सामन्यात रोहित सेना मालिका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला प्रमुख गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
नागपुरातील सामन्यात भारताला सर्वसमावेशक विजयासह बरोबरी साधता आली. या सामन्यात अक्षर पटेलने दोन षटकांच्या स्पेलमध्ये दोन विकेट्स घेतल्या. परंतु पहिल्या सामन्यात त्याला संघर्ष करावा लागला. दुसरीकडे जसप्रीत बुमराह जबाबदारी पार पाडेल याची खात्री आहे. मात्र, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा डेथ ओव्हर्समधील खराब प्रदर्शन ही खरी चिंता आहे.
Nagpur ✅
Hello Hyderabad! 👋#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/gIey9Ncqm8
— BCCI (@BCCI) September 25, 2022
आशिया चषकात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्याने असंख्य धावा दिल्या. यामुळेच त्याला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले असावे. कदाचित, आठ षटकांसाठी फक्त चार गोलंदाजांची गरज असल्याने कर्णधार रोहित शर्माने त्याला विश्रांती दिली असेल. पण संघासाठी भुवनेश्वरचा फॉर्म चिंताजनक आहे.
दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेलचाही अद्याप आत्मविश्वास वाढलेला नाही. कदाचित लय शोधण्यासाठी त्याला आणखी दोन सामन्यांची गरज आहे. मालिकेतील तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.
मधल्या षटकांमध्ये भारतीय संघ फिरकीपटूंवर अवलंबून असतो. या षटकांत अक्षर आणि युझवेंद्र चहलला निर्णायक कामगिरी करता आली नाही. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा ट्रेंड कायम राहिला. परंतु, बुमराह परतल्याने संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. फलंदाजीत रोहित, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. याशिवाय सुर्यकुमार यादवही काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला असून हार्दिक पांड्यालाही कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
भारतीय फलंदाजांसाठी लेग स्पिन गोलंदाजी डोकेदुखी ठरत आहे. या कमकुवतपणाचा ऍडम झाम्पाने चांगला उपयोग केला आहे. मागील सामन्यात फिनिशर टू परफेक्शनची भूमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकला या सामन्यात खेळविण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही त्यांच्या गोलंदाजीची चिंता असेल. पहिल्या सामन्यात भारतावर मात केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला. ऍरॉन फिंच आणि मॅथ्यू वेड यांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही गोलंदाजी पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरली.
दुखापतग्रस्त नॅथन ऍलिसच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि डॅनियल सॅम्स यांनी एका षटकात 11 धावा दिल्या. अष्टपैलू कॅमेरून ग्रीनही महागात पडला आहे. परंतु वेडने चमकदार कामगिरी केली आहे. एकंदरीत, टी-20 विश्वचषकापूर्वी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.