Chandrashekhar Bavankule reply to Ajit Pawar – राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने शनिवारी जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. सरकार स्थापन झाल्यापासून जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत होता. शिंदे – फडणवीस सरकारमधील अनेक इच्छूकांचे देखील पालकमंत्रिपदांची घोषणा कधी होते याकडे लक्ष्य लागले होते. अशातच शनिवारी झालेल्या घोषणेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावरून फडणवीसांना टोला लगावला होता. पवार यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar on Devendra Fadanvis
एक जिल्हा सांभाळताना नाकीनऊ यायचे, सहा सहा कसे संभाळणार असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. एक व्यक्ती सहा जिल्हे कसे सांभाळणार असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हांची जबाबदारी आहे. पुण्याच्या पालकमंत्री असताना माझे नाकीनऊ यायचे असे अजित पवार म्हणाले.
बावनकुळेंचे प्रत्युत्तर | Chandrashekhar Bavankule reply to Ajit Pawar
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची क्षमताच काढली. “अजित पवारांनी आपल्या क्षमतेची बरोबरी देवेंद्र फडणवीसांच्या क्षमतेशी करू नये.” असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांचेही अजित पवारांना प्रत्युत्तर । Devendra Fadanvis reply to Ajit Pawar
अजित पवार यांनी लागवलेल्या टोल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले. आपण मुख्यमंत्रीपद सांभाळले असल्याची आठवण करून देत फडणवीसांनी, ‘मी संपूर्ण राज्य सांभाळलंय 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात,’ वक्तव्य केले.