नवी दिल्ली – महंमद शमी, रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर अखेर ऑस्ट्रेलियाने जिद्दी फलंदाजी केली. उस्मान ख्वाजा व पीटर हॅंड्सकॉम्ब यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपूष्टात आला. या दोन संघात आजपासून सुरु झालेल्या या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान भारताने आपल्या पहिल्या डावात एकही गडी न गमावता 21 धावा केल्या आहेत.
भारतीय संघ आता 242 धावांनी पिछाडीवर आहे.ऑस्ट्रेलियाच्या 263 धावांचा पाठलाग सुरु केल्यावर कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी सावध फलंदाजी करत दिवसातील उर्वरीत वेळेत एकही नुकसान होऊ न देता 21 धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा रोहित 13 तर राहुल 4 धावांवर खेळत आहेत.
Stumps on Day 1⃣ of the second #INDvAUS Test!#TeamIndia openers see through the final overs of the day’s play and finish with 21/0 👌
We will be back with action tomorrow on Day 2, with India trailing by 242 more runs.
Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8 @mastercardindia pic.twitter.com/isQQ7ayrEv
— BCCI (@BCCI) February 17, 2023
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत कोरड्या ठणठणीत खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करताना डेव्हीड वॉर्नर व उस्मान ख्वाजाने संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, वॉर्नर स्थिरावल्यावरही बाद झाला. ख्वाजाने मात्र, एक बाजू लवून धरली होती.
भरात असलेला मार्नस लेबुशेन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 18 धावा केल्या. लेबुशेनला पायचित केलेल्या रवीचंद्रन अश्विनने पाठोपाठच्या चेंडूवर स्टिव्हन स्मिथलाही तंबूत धाडले. या सामन्यात संघात परतलेला ट्रॅव्हीस हेडनेही निराशा केली. मात्र, त्यानंतर ख्वाजाला सुरेख साथ देताना पीटर हॅंड्सकॉम्बने संघाचे दीडशतक फलकावर लावले.
ख्वाजा भरात आला होता व त्याला शतक साकार करण्याचीही संधी होती. मात्र, रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा अफलातून झेल घेत एक सुरेख खेळी संपूष्टात आणली. ख्वाजाने आपल्या 81 धावांच्या खेळीत 125 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 1 षटकार फटकावला.
ख्वाजा परतल्यावर ऍलेक्स साफ अपयशी ठरला. त्यावेळी कर्णधार कमिन्सने उपयुक्त खेळी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. तो 33 धावांवर परतला व त्यानंतर अश्विन, जडेजा यांच्यासह महंमद शमीने तळातील फलंदाजांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर रोखला. भारताकडून शमीने 4 गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 78.4 षटकांत सर्वबाद 263 धावा. (उस्मान ख्वाजा 81, पॅट कमिन्स 33, पीटर हॅंड्सकॉम्ब नाबाद 72, महंमद शमी 4-60, रवीचंद्रन अश्विन 3-57, रवींद्र जडेजा 3-68).
भारत पहिला डाव – 9 षटकांत बिनबाद 21 धावा. (रोहित शर्मा खेळत आहे 13, लोकेश राहुल खेळत आहे 4).