मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात ज्यांच्यामुळे वादळ उठले आहे ते अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट झाली आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही. शरद पवार आणि गौतम अदाणी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते.
गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असे स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यासाठी त्यांनी कारणही दिलं आहे. एवढंच नाही तर देशात इतर प्रश्नही अदाणी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच JPC म्हणजेच संयुक्त संसदीय समितीच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडली होती. या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी आपण आपलं मत मांडलं असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांना जेपीसी हवी असेल तर माझी ना नाही असंही म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता आज गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी चर्चा होणार असल्याचे दिसत आहे.