कामशेत, दि.11 – मावळ तालुक्यातील भौगोलिक वैविध्य व आर्द्रतेमुळे सुगंध व चविष्ट इंद्रायणी तांदळाला मोठी मागणी आहे. या तांदळाच्या वाणाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. हे संकरित वाण असल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळविण्यात अडचण येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र तरदेखील आपण इंद्रायणी तांदळाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करू. प्रसंगी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मदत घेऊ, असे ते म्हणाले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने तालुक्यातील चार शेतकरी सहकारी गटांना तांदूळ खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कामशेत येथे शुक्रवारी (दि.11) पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सुरेश घुले, भालचंद्र जगताप, पूजा बुट्टे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विक्रम खुटवड, प्रदीप गारटकर, बबनराव भेगडे, गणेश खांडगे, नामदेव दाभाडे, दीपक हुलावळे, दिपाली गराडे, सचिन घोटकुले, रमेश साळवे यांच्यासह जिल्हा बॅंकेचे अधिकारी मावळातील सोसायट्यांचे सचिव पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंद्रायणी नदी आपल्या भागातील लोकांचा कणा आहे. त्याप्रमाणे इंद्रायणी तांदूळदेखील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दोन्हीकडे शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला सक्षम यंत्रणा उभी करावीच लागेल. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरी व ग्रामीण भागाला जोडणारा इंद्रायणी तांदूळ हा एक दुवा आहे. या उपक्रमामुळे चोखंदळ ग्राहकांना इंद्रायणी तांदूळ खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. दर्जा व पॅकींग यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
आमदार शेळके यांनी आपल्या मनोगतामध्ये इंद्रायणीसाठी मॉलसारखी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच प्रतिकिलो 23 रुपयांऐवजी 24 रुपयांनी इंद्रायणी तांदूळ खरेदी करणार असल्याचे जाहीर केले.
माऊली दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील चांदेरे यांनी आभार मानले.