‘सुखोई-30’च्या प्रात्यक्षिकांद्वारे “इंद्र’ची सांगता

भारत-रशिया राष्ट्रांच्या तिन्ही सैन्यदलांचा संयुक्त लष्करी सराव

पुणे – ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने हवेत झेपावणाऱ्या “सुपरसॉनिक’ लढाऊ विमान असलेल्या सुखोईच्या प्रात्यक्षिकांद्वारे भारत-रशिया यांच्यातील “इंद्र’ या संयुक्त लष्करी सरावाची पुण्यात सांगता झाली. याप्रसंगी भारतीय आणि रशियन वैमानिकांनी प्रथमच भारतात एकत्रितपणे सुखोई-30 या विमानातून उड्डाण केले.

भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांच्या तिन्ही सैन्यदलांचा एकत्रितपणे “इंद्र’ या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप पुण्यातील लोहगाव हवाई दलाच्या केंद्रावर झाला. याप्रसंगी लोहगाव हवाई दल केंद्राचे प्रमुख एअर कमोडोर राहुल भसिन, “सुखोई 30 स्वॉड्रन’चे प्रमुख ग्रुप कॅप्टन प्रोमित भसिन, सरावाचे संयोजक टी.जे. सिंग, रशियन हवाईदलाच्या तुकडीचे प्रमुख कर्नल बर्जिन सेरेगे, लेफ्टनंट कर्नल नेस्ट्रेव ऍन्ड्रे उपस्थित होते. भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यदलांमध्ये परस्पर सहकार्य वाढावे आणि विविध लष्करी मोहिमांमध्ये दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामधील सहकार्य वाढवे या हेतूने “इंद्र’ या संयुक्त लष्करी मोहिमेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे दोन्ही देशांच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचा (ट्राय-सर्व्हिसेस) सहभाग या सरावात असतो. यंदा प्रथमच भारतात हा त्रिदलीय सराव आयोजित करण्यात आला असून बबिना (झांसी), पुणे आणि गोवा या तिन्ही ठिकाणी हा सराव घेण्यात आला. पुण्यात मुख्यत: हवाईदलाचा सराव आयोजित करण्यात आला होता.

हवाईदलाच्या सरावांतर्गत भारत आणि रशियन वैमानिक, ग्राऊंड स्टाफ आणि तांत्रिक विभागातील अधिकारी यांनी एकत्र येत, एकमेकांच्या काम करण्याच्या पद्धती, विविध यंत्रणा याबाबत माहितीची देवाणघेवाण आणि प्रात्यक्षिके करण्यात आली. या सरावांतर्गत हवाईदलातील विविध लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी झाली होती. यामध्ये सुखोई-30, जॅग्वार, एलसीए तेजस, मिराज 2000 ही लढाऊ तर आयएल 76, एएन-32, मी 17 व्ही 5 यासारखी मालवाहू विमाने यांचा समावेश आहे.

या संयुक्त सरावामुळे भारतीय हवाई दलाच्या वैमानिक आणि इतर अधिकाऱ्यांच्या कामाला प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळाली. भारतीय हवाईदलाचे व्यावसायिकता, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणवृत्ती याचा प्रत्यय घेता आला. पुढील काळातही अशाप्रकारचे अधिक सराव होण्याची आवश्‍यकता आहे.
– बर्जिन सेरेगे, रशियन सैन्यतुकडीचे प्रमुख


संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमांमध्ये विविध राष्ट्रांचे सैन्य एकत्रित येऊन काम करतात. अशा शांतता मोहिमांमध्ये सहभागी होण्यापूर्वी जर दोन राष्ट्रांनी संयुक्त सराव केला, तर त्यांच्यामधील परस्पर सामंजस्य वाढण्यास नक्‍कीच मदत मिळेल, याच उद्देशाने इंद्र या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले होते. याचा आगामी मोहिमांमध्ये निश्‍चितच फायदा होईल.
– राहुल भसिन, लोहगाव हवाईदल केंद्राचे प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.