नवी दिल्ली – भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिने यंदाच्या मोसमात दुहेरी गटात विजेतेपद मिळवण्याची हॅट्ट्रिक साधली आहे. तिने रविवारी दुबईत झालेल्या अल हबटूर करंडक टेनिस स्पर्धेत कॅटरीन गोर्गादेजेसह खेळताना विजेतेपद पकावले. यंदाच्या वर्षातील हे तिचे तिसरे दुहेरी गटाचे विजेतेपद ठरले आहे.
मार्चपासून करोनाचा धोका वाढल्यामुळे स्पर्धा रद्द झाल्या होत्या. तर, काही स्पर्धा लांबणीवर पडल्या होत्या. आखाती देशातील करोनाचा धोका कमी झाल्याने ही स्पर्धा खेळवण्यात आली. त्यात अंकिताने कॅटरीनसह खेळताना दुहेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या अलियोना बोलसोव्ह जादोइनोव्ह व स्लोव्हाकियाच्या काजा जुवान या जोडीवर 6-4, 3-6, 10-6 अशी तीन सेटमध्ये विजय मिळवला.
अंकिताने या सत्रात अंतिम फेरी गाठलेली ही चौथी स्पर्धा होती. परंतु आतापर्यंतच्या स्पर्धांपैकी ही स्पर्धा सर्वात मोठी होती. यंदाच्या मोसमात फेब्रुवारी महिन्यात अंकिताने तीन वेगवेगळ्या स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. यामध्ये तिने बिबियाने शूफ्ससह थाईलंडच्या नोंथाबुरीमध्ये लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे.
जोधपूरमध्ये पार पडलेल्या टेनिस स्पर्धेत तिने भारताची टेनिसपटू स्नेहल मानेसह अंतिम फेरी गाठली. पंरतु अंतिम फेरीत अंकिता-स्नेहल जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.