नवी दिल्ली – कोविड-19 विरोधात देशांतर्गत लस विकसित करण्याबरोबरच प्रत्येक रुग्णाच्या निदान करण्याचा एकिकृत प्रतिक्रियेचे धोरण भारताने स्वीकारले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे. “ब्रिक्स’ देशांच्या 8 व्या परिषदेंतर्गत मंत्रीस्तरिय बैठकीमध्ये ते बोलत होते.
भारत सर्व मोठ्या लसींसाठी क्लिनिकल चाचण्या देखील करीत आहे आणि सुमारे 20 लस विकासित करण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यापैकी दोन लसी अगदी प्रगत अवस्थेत आहेत. कोवॅक्सिन ही लस “अयसीएमआर’ आणि भारत बायोटेकच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित केली जात आहे आणि “कोविशिल्ड’ ही लस सीरम इन्स्टिट्युट विकसित करत आहे. या दोन्ही लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत, असेही वर्धन यांनी सांगितले.
भारतातील सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही संशोधन व विकास संस्था साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप विकसित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले. सुमारे 100 पेक्षा जास्त स्टार्ट-अप्सने कोविड -19 साठी नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित केली आहेत, असेही वर्धन म्हणाले.
8 व्या ब्रिक्स विज्ञान, तंत्रज्ञान व नाविन्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने ब्रिक्स एसटीआय जाहीरनामा 2020 स्वीकारण्यात आला. रशियाचे विज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री व्हॅलेरी फाल्कोव्ह, ब्राझीलचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यमंत्री मार्कोस पोन्टेस, चीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रथम उपमंत्री हुआंग वी, दक्षिण आफ्रिकेचे उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री बोंगिंकोसी इमॅन्युएल निझिमंडे यांच्यासह सदस्य देशांतील अनेक मान्यवरांनी या बैठकीत भाग घेतला.