डावाने विजयाची भारताची हॅट्ट्रिक

इंदोर: पहिल्या डावातील तीन व दुसऱ्या डावात चार विकेट्‌स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या झंझावाती गोलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी बांगलादेशचा डाव सावरू न शकल्याने, भारताने येथील होळकर मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर एक डाव आणि 130 धावांनी मात करत, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा 10 वा डावाने विजय ठरला आहे. धोनीने कर्णधार म्हणून 9 सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवून दिला आहे.

प्रथम फलंदाजी करताना बांगला देशचा डाव 150 धावांत संपला होता. भारताने आपला पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित करत बांगलादेशवर 343 धावांची आघाडी घेतली होती. मात्र त्यांचा दुसरा डाव 213 धावांत आटोपल्याने भारताला सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी मोठा विजय साकारता आला. या विजयाने भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत 60 गुणांची भर घातली. आयसीसी मानांकनात भारताच्या खात्यात आता 300 गुण जमा झाले आहेत. या मालिकेआधी संपलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत एका डावाने पराभूत केल्यानंतर बांगला देशलाही तसेच हरवत भारताने डावाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारताच्या 6 बाद 493 धावा झाल्या होत्या. त्यामध्ये सलामीवीर मयांक आग्रवालचे द्विशतक (243 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (86), रविन्द्र जाडेजा (60) तर चेतेश्‍वर पुजारा (54) या तिघांच्या अर्धशतकांचा समावेश होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होत असतानाच भारतीय कर्णधार विराट कोहलीने कालच्याच धावसंख्येवर आपला डाव घोषित केल्याचे जाहीर केल्याने पाहुण्यांच्या तंबूत गडबड उडाली.
बांगलादेशचे सलामीवीर शादमान इस्लाम आणि इमरुल कायेस मैदानात उतरले आणि सुरुवातीपासूनच त्यांनी

सावधपणाचा पवित्रा घेतला. मात्र डावाच्या सहाव्या षटकाच्या उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर कायेसचा त्रिफळा उडाला आणि भारतीय खेळाडूंनी पाहुण्या संघाच्या फलंदाजांवर दडपण वाढवण्यास सुरुवात केली. (बांगलादेश 1 बाद 10). पुढे इशांत शर्माच्या सातव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूंवर शादमान इस्लाम पायचित पकडला गेला. (बांगला देश 2 बाद 12). मोहम्मद शामीने टाकलेल्या तेराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर “बेंगॉल टायगर्स’चा कर्णधार मोईनुल हक अवघ्या सात धावांवर पायचित झाला. (बांगला देश 3 बाद 37).

अशा पडझडीनंतर मुशफिकूर रेहमानने एकहाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज असलेल्या मोहम्मद मिथुनचा झेल मयांक अग्रवालने पकडला. मिथुनला 18 धावा करता आल्या. पण त्यात त्याने चार खणखणीत चौकार लगावले होते. (बांगलादेश 4 बाद 44) मुशफिकूर रेहमानने खेळपट्टीवर नांगर टाकत मोठी खेळी उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली होती. चुकार चेंडूवर चौकार तर एक-दोन धावा सातत्याने घेत त्याने धावफलक हलता ठेवला. आपल्या 150 चेंडूंच्या खेळीत सात चौकारांसह 63 धावा केल्या. चेतेश्‍वर पुजाराने रविचंद्रन अश्‍विनच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला आणि पाहुण्यांच्या उरल्या-सुरल्या आशा मावळल्या. संपूर्ण डावात मुशफिकूर रहीम आणि लिटन दास यांची 63 धावांची भागीदारी उल्लेखनीय ठरली.

मग शामी आणि आश्‍विनने बांगलादेशच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. मोहम्मदुल्लाह (38) आणि लिटन दास (35) यांनी थोडाबहुत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तैजुल इस्लाम (6), अबु जायेद नाबाद 4 आणि इबादत हुसेन (1) अशा कामगिरीने बांगलादेशचे शेपूट गुंडाळण्यात भारताला यश आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here