विज्ञानविश्‍व: ही शहरे आहेत खरोखरीच स्मार्ट

डॉ. मेघश्री दळवी
स्मार्ट शहरे हा विषय अलीकडे कायम चर्चेत असतो. सुरक्षा आणि सुविधा या दोन्हींसाठी स्मार्ट शहरे नावाजली जातात. पण त्याहीपलीकडे अशा शहरांचे वेगवेगळे पैलू असतात. शाश्‍वत तंत्रज्ञान, नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांचा वापर, उत्तम कचरा व्यवस्थापन, पाण्याचे आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शहरात हिरवाई आणि खेळांसाठी उपलब्ध जागा अशा अनेक गोष्टींचा विचार करून कोणती शहरं खरीखुरी स्मार्ट आहेत याचा अंदाज घेता येतो. अशा शहरांमध्येच व्यवसायांची वाढ दिसून येते.

सिंगापूरमधील आयएमडी हे मोठं बिझनेस स्कूल. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांविषयी तुलनात्मक आणि स्पर्धात्मक संशोधन इथे नेहमी होत असतं. यावर्षी त्यांनी जगातल्या शंभरहून अधिक स्मार्ट शहरांचा अभ्यास करून त्यात क्रमवारी लावली आहे. पहिला क्रमांक मिळाला आहे सिंगापूरला. त्याखालोखाल स्वित्झर्लंडमधील झुरीक,
नॉर्वेची राजधानी ऑस्लो, स्वित्झर्लंडमधीलच जिनिव्हा आणि डेन्मार्कची राजधानी कोपनहागेन यांचा क्रम लागतो. न्यूझीलंडमधील ऑकलंडला सहाव्या क्रमांकाचा मान आहे. पुढे तैवानमधील तायपे शहर, फिनलंडची राजधानी हेलसिंकी, स्पेनमधील बिल्बाव शहर आणि जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ शहर आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी सोल खरं तर पहिलं स्मार्ट शहर, पण इतर शहरं भराभर पुढे निघून गेली आहेत आणि सोल आता 47व्या क्रमांकावर आहे. अमेरिका प्रगत देश म्हटलं तरी तिथलं पहिलं शहर या यादीत आहे सॅन फ्रान्सिस्को, बाराव्या स्थानावर. टॉप टेनमध्ये हा देश नसण्यामागे प्रचंड प्रमाणात कचरानिर्मिती, त्याची विल्हेवाट लावण्यात पारंपरिक पद्धतींचा वापर आणि रिसायकलिंगच्या कमी सुविधा ही कारणं आहेत. तर लंडन विसाव्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे.
ही यादी बनवताना नागरिकांना सुविधा कितपत पोहोचतात, तांत्रिक आणि आर्थिक बाबींचा मेळ कसा घातला आहे आणि सोबत शहर आपलं माणूसपण किती राखू शकतं याचा विचार केला आहे.

अर्थात अशा गोष्टींचं मोजमाप थेट आणि काटेकोरपणे करता येत नसल्याने ही यादी वादग्रस्त ठरू शकते. तरीही स्कॅंडेनेव्हीयन देशांचा एकूणच रोख माणूसपण जपण्याकडे असल्याने त्यांना वरचं स्थान मिळालेलं आहे. तुलनेत तंत्रज्ञानात आघाडीवर असणारे दक्षिण कोरिया, चीन यासारखे देश या यादीत मागे आहेत. स्मार्ट शहरांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागल्याने विकसनशील देश साहजिकच मागे पडतात. पण प्रत्यक्षात अशाच देशांना स्मार्ट आणि सुरक्षित शहरांची गरज असते.

भारत या यादीत कुठे आहे? हैदराबाद 67व्या क्रमांकावर आहे. नवी दिल्ली 68, मुंबई 78, तर बेंगळुरू आहे 79 व्या स्थानावर. आपल्याला अनेक आघाड्यांवर काम करून आपली क्रमवारी वाढवायची आहे. विशेषत: स्वच्छता, ऊर्जेची उपलब्धता आणि पाण्याचे नियोजन या बाबतीत आपल्याला या यादीतील शहरांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here