नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने बुधवारी जाहीर केलेल्या हॉकी पुरस्कारांमध्ये भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघातील खेळाडूंनी जवळपास सर्वच देशांवर वर्चस्व गाजवले. पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंग तर, महिलांमध्ये गुरुजीत कौर सर्वोत्तम खेळाडू ठरले.
जपानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघांनी या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. केवळ खेळाडूंनीच नव्हे प्रशिक्षकांनीही आपली मक्तेदारी सिद्ध केली. जागतिक पुरस्कारांच्या या यादीत भारताने तब्बल 8 पुरस्कार मिळवले आहेत.
भारताच्या पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले. महिला संघानेही मोठ्या कालावधीनंतर ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला होता. भारताने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपर, उदयोन्मुख खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक हे जवळपास सर्व गटातील पुरस्कार पटकावले आहेत.
राष्ट्रीय संघटना, चाहते व प्रसिद्धी माध्यमे अशी तीन भिन्न श्रेणींमधून या पुरस्कारांसाठी मतदान केले जाते. भारताच्या विजेत्या खेळाडूंनी तिन्ही श्रेणींत सर्वाधिक पसंती मिळवली. जगभरातील 79 राष्ट्रीय संघटना, त्यांचे प्रशिक्षक आणि सर्व देशांचे कर्णधार हे या श्रेणीचे प्रतिनिधित्व करतात. महासंघाच्या या पुरस्कार मतदानात आशियाई गाटतील 33 पैकी 29, आफ्रिका गटातील 25 पैकी 11, युरोपमधील 42 पैकी 19, ओशनियामधील 8 पैकी 3 आणि पॅन अमेरिकेतील 30 पैकी 17 जणांनी मतदान केले होते.
तसेच जगभरातून तब्बल 30 हजार चाहत्यांनी मतदानात सहभाग घेतला. सर्वोत्तम प्रशिक्षकांसाठीचा पुरुष व महिला गटाचा पुरस्कारही भारताच्या संघांशी जोडल्या गेलेल्या गॅहम रीड व शोर्ड मॅरीज्ने यांनीच पटकावला आहे. रीड अद्याप भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायम असून मरीज्ने यांचा करार टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर संपुष्टात आला आहे.
बेल्जियमकडून आश्चर्य आणि नाराजी
या पुरस्कारांमध्ये जवळपास सर्वच पुरस्कार भारताने पटकावल्यामुळे व्यथित झालेल्या बेल्जियम हॉकी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे कसे काय शक्य झाले, याचे आश्चर्यही व्यक्त केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतरही आणि या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाल्यानंतरही बेल्जियमला एकही पुरस्कार मिळालेला नाही. हे मतदान प्रक्रियेचे अपयश आहे की आणखी काही, असा सवालही त्यांच्या हॉकी संघटनेने विचारला आहे.
पुरस्कार विजेते
महिला –
सर्वोत्कृष्ट खेळाडू – गुरजीत कौर
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सविता पुनिया
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – शर्मिला देवी
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – शोर्ड मॅरिज्ने
पुरुष –
सर्वोत्कृष्ट खेळाडू – हरमनप्रीत सिंग
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – पी. आर. श्रीजेश
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – विवेक प्रसाद
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – ग्राहम रीड