लीबियात अपहरण झालेल्या भारतीयांची सुटका

नवी दिल्ली – लीबियामध्ये अपहरण झालेल्या 7 भारतीयांची सुटका झाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या भारतीय नागरिकांचे 14 सप्टेंबर रोजी लीबियातील अस्वेरिफ येथून अपहरण झाले होते. या सर्वांची सुटका झाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अपहरणकर्त्यांनी या भारतीय नागरिकांना अल शोला अल मुदिया या तेलकंपनीकडे सोपवल्यानंतर सुटका झालेल्या सर्व भारतीयांशी ट्युनिशियातील भारताचे राजदूत पुनीत रॉय कुंदल यांनी फोनवरून संवाद साधला आहे.

हे सर्वजण सुखरूप असून ब्रेगा येथे कंपनीच्या आवारातच मुक्कामास आहेत. त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी आवश्‍यक असलेल्या औपचारिकता लवकरच पूर्ण केल्या जातील, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय नागरिकांच्या सुखरूप सुटकेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने लीबियातील सरकार आणि स्थानिक आदिवासींमधील ज्येष्ठ समन्वयकांचे आभार मानले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.