वारसॉ (पोलंड) – दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटनने टाकलेल्या टॉलीबॉय हा मोठा बॉम्ब स्चेसिनच्या बंदराकडे जाणाऱ्या समुद्राच्या प्रवाहाच्या पाण्यात तळापाशी पडलेला आहे. हा बॉम्ब काढून निकामी करण्यासाठी पोलंडच्या नौदलाला काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
हे काम सुरू असेपर्यंत वायव्य पोलंडमधील शेकडो नागरिकांना काही दिवसांसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खोल पाण्यात सुरू असलेल्या कामादरम्यान हा 5.4 टन वजनाचा बॉम्ब दिसला होता. प्रसिद्ध बाल्टिक समुद्राच्या स्विनौजसी रिसॉर्टजवळच्या दक्षिणेच्या किनाऱ्याजवळ हा बॉम्ब आहे. स्चेसिनप्रमाणेच स्विनौजसी हे देखील नाझी जर्मनी सैन्याचे अत्यंत वर्दळ असलेले ठिकाण होते.
ब्रिटन सैन्याने टाकलेल्या बॉम्बला निकामी करण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात आले आणि आणखीन पाच दिवस हे काम सुरू राहण्याची अपेक्षा आहे. हा बॉम्ब पाण्याखालीच नियंत्रित स्फोट घडवून आणून निकामी केला जाणार असून त्यासाठी तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.
अशा प्रकारचा बॉम्ब पाण्याखाली निकामी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जर्मनी, नॉर्वे आणि फ्रान्समध्ये अशा प्रकारचे टॉलीबॉय बॉम्ब जमिनीवर आणून निकामी केले गेले होते.
संभाव्य स्फोटामुळे सुमारे अडीच किलोमीटरच्या परिसरातील 750 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आजूबाजूची वाहतुकही काही दिवस बंद करण्यात आली आहे.