भारतीय संशोधक महिलेची अमेरिकेत हत्या

ह्युस्टन: मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या एका 43 वर्षीय संशोधक महिलेची अमेरिकेत ती जॉगिंगला गेली असताना हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. शर्मिष्ठा सेन असे या महिलेचे नाव आहे.

ती टेक्‍सास प्रांताच्या प्लानो शहरात राहात होती. चिशोलम ट्रेल पार्क येथे 1 ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे जॉगिंग करीत असताना तिच्यावर एका इसमाने हल्ला करून तिला ठार मारले. शर्मिष्ठा ही मॉलेक्‍युलर बॉयोलॉजी या विषयात तज्ज्ञ होती. कॅन्सर पेशंटवर उपचाराचे संशोधनही ती करीत होती.

या प्रकरणी संबंधित हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशाने त्याने ही हत्या केली असे सांगण्यात येत आहे. बकारी अबिओना मॉनक्राईफ असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव आहे. एक जण तिची हत्या करीत असताना दुसरा कोणी तरी शेजारचे घर
फोडत होता. त्यातून हा प्रकार झाला आहे.

या हत्येमागे दुसरा कोणताही हेतू नसावा असा पोलिसांचा कयास आहे. हा एक अगदी विरळ प्रकार आहे त्यामुळे चिंतेचे कारण नाही अशी ग्वाहीही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. शर्मिष्ठा सेन या ऍथलिट होत्या. त्या नियमीत जॉगिंगचा व्यायाम करायच्या. त्यांना दोन लहान मुले आहेत. तिच्या निधनाबद्दल तिच्या आसपासच्या असंख्य नागरिकांनी संबंधित
पार्कमध्ये जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.