Indian umpire Nitin Menon sets New Record – भारताच्या नितीन मेनन यांना आयसीसीने एलिट पॅनलमध्ये कायम राखले आहे. तसेच शरफुद्दौला इब्ने शाहीद यांचाही या पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. एलिट पॅनलमध्ये सहभागी होणारे शाहीद हे बांगलादेशचे पहिले पंच ठरले आहेत. मेनन यांना २०२० मध्ये प्रथम आयसीसीच्या एलिटपॅनलमध्ये स्थान मिळाले होते. त्यानंतर त्यांनी सलग पाचव्यांदा आपले स्थान राखले आहे. आयसीसीने पंच व सामनाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.
एकूण १२ पंचांचा या पॅनलमध्ये समावेश असून यात मेनन हे एकमेव भारतीय आहेत. मेनन यांनी आतापर्यंत २३ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ४१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचाची भूमिका पार पाडली आहे. पंच म्हणून एकूण १२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेले मेनन आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान एस. वेंकटराघवन यांचा १२५ सामन्यांचा विक्रम मोडू शकतील. मेनन यांनी गेल्या वर्षी अशेस मालिकेतही पंच म्हणून काम केले होते. मेनन यांच्यापूर्वी भारताकडून एस. रवी आणि वेंकटराघवन यांनाच एलिट पॅनलमध्ये स्थान मिळवता आले होते.
दुसरीकडे, बांगलादेशच्या शरफुद्दौला यांना विशेष पंच श्रेणीत बढती मिळाली आहे. ते आता निवृत्त झालेल्या मरे इरॅस्मस यांची जागा घेतील. शर्फुदुल्ला यांनी आतापर्यंत १० कसोटी, ६३ एकदिवसीय आणि ४४ ट्वेन्टी-२० सामन्यांत पंचाची भूमिका बजावली आहे. तसेच महिलांच्या १३ एकदिवसीय आणि २८ ट्वेन्टी-२० सामन्यांतही त्यांनी पंच म्हणून काम केले आहे.
अनुभवी ख्रिास ब्रॉड यांना सामनाधिकाऱ्यांच्या एलिट पॅनलमधून वगळण्यात आले आहे. या श्रेणीत गेल्या वर्षी सात जणांचा समावेश होता, तर यंदा केवळ सहा जणांना स्थान मिळाले आहे. ब्रॉड यांनी १२३ कसोटी, ३६१ एकदिवसीय आणि १३५ ट्वेन्टी-२० सामने, तसेच महिलांच्या १५ ट्वेन्टी-२० सामन्यांत सामनाधिकारी म्हणून काम केले आहे.
एलिट पॅनेल पंच
नितीन मेनन (भारत), कुमार धर्मसेना (श्रीलंका), ख्रिास्तोफर गॅफनी (न्यूझीलंड), मायकल गॉफ (इंग्लंड), अड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड), एहसान रझा (पाकिस्तान) , पॉल राफेल (ऑस्ट्रेलिया), शरफुद्दौला इब्ने शाहीद (बांगलादेश), रॉड टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (वेस्ट इंडिज).
सामनाधिकारी
जवागल श्रीनाथ (भारत), डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया), जेफ क्रो (न्यूझीलंड), रंजन मदुगले (श्रीलंका), अँडी पायक्रॉफ्ट (झिम्बाब्वे), रिची रिचर्डसन (वेस्ट इंडिज).