हरारे – झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या शुभमन गिलने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक फटकावले. त्याने ही खेळी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व रोहित शर्मा यांच्या कामगिरीलाही मागे टाकले आहे.
गिलने झिम्बाब्वेत वयाच्या 22 वर्षे आणि 348 दिवस वयात एकदिवसीय शतक फटकावले. त्याने रोहितला मागे टाकले आहे. रोहितने 23 वर्षे 28 दिवस वयाचा असताना झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय शतक साकार केले होते. आता गिल झिम्बाब्वेविरुद्ध त्यांच्या भूमीवर सर्वात तरुण शतक फटावणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आला आहे. झिम्बाब्वेमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा गिल हा भारताचा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम आता गिलच्या नावावर झाला आहे. सचिनने या हरारेच्या मैदानात नाबाद 122 धावांची खेळी साकारली होती. गिलने या सामन्यात 130 धावांची खेळी साकारली आणि सचिनचा विक्रमही मोडीत काढला आहे.
गिलने या मैदानातील सर्वाधिक धावांची खेळी साकारली आहे. या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अंबाती रायुडूच्या नावावर होता. रायुडूने 2015 साली या मैदानात खेळत असताना नाबाद 124 धावांची खेळी साकारली होती. गिलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 97 चेंडूत 130 धावा केल्या आणि हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत तो आता पहिल्या क्रमांकावर आला आहे.
गिलची विश्वकरंडकासाठी दावेदारी
यंदाच्या मोसमात गिल भरात असून त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 64, 43 आणि नाबाद 98 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये 33 धावा केल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये त्याने शतक फटकावले. गिलने 2022 सालापूर्वी खेळलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता आगामी विश्वकरंडकासाठी गिलने आपली दावेदारी सिद्ध केली आहे.