नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील एका आठवडाभर तुम्हाला रेल्वे तिकीट बुकिंग सेवांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 नंतर, प्रवासी सेवा सामान्य करण्यासाठी आणि सुविधा वाढवण्यासाठी पुढील एक आठवडा रेल्वे प्रवासी आरक्षण व्यवस्था रात्रीच्या वेळी विस्कळीत होईल. या काळात प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही.
रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली आहे की, प्रवासी सेवा सुरळीत करण्यासाठी आणि सेवेतील प्री-कोविड सुविधा परत आणण्यासाठी, रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) पुढील 7 दिवस रात्रीच्या काही तासांसाठी बंद असेल.
कोणत्या सेवा आणि कधीपासून बंद राहतील?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पीआरएस सेवा वगळता इतर सर्व चौकशी सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्णपणे सुरू राहतील. परंतु, यादरम्यान रेल्वे प्रवासी पुढील एका आठवड्यात ठराविक वेळेत तिकीट काढू शकणार नाहीत. रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘ही सुधारणा प्रक्रिया 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. तर 20 आणि 21 नोव्हेंबर रात्री 23:30 वाजता नंतर सेवा सुधारणा प्रक्रिया पूर्ण होऊन तिकीटाची काढण्याची प्रक्रिया सुरळीत होईल.
दररोज 23:30 ते 05:30 (6 तास) या वेळेत सेवा बंद राहणार आहेत. यावेळी कोणत्याही PRS सेवा (तिकीट आरक्षण, बुकिंग रद्द करणे, चौकशी सेवा इ.) उपलब्ध होणार नाहीत. पीआरएस सेवा वगळता इतर सर्व चौकशी सेवा अखंड सुरू राहतील.