वाॅशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या दावेदार भारतीय वंशाच्या निक्की हेले यांनी रिपब्लिकन पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षपदाचे दावेदार असलेले विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्या वाढत्या वयावर निशाणा साधला आहे. निक्की हेले दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रचार करत आहेत. मात्र एकूण कल पाहता, त्या पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण कॅरोलिनामध्ये २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक निवडणुका होणार आहेत. दक्षिण कॅरोलिना हा निक्की हेलेंचा बालेकिल्ला असून तिथून त्या गव्हर्नर होत्या. त्यामुळेच त्या दक्षिण कॅरोलिनामध्ये आपला निवडणूक प्रचार जोमाने राबवत आहे. निक्की हेले यांनी आपल्या प्रचारात डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांचा उल्लेख संतप्त वडील असा केला आहे.
हेले यांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर करत दोन्ही नेत्यांच्या वाढत्या वयावरही निशाणा साधला आहे. बायडेन ८१ वर्षांचे आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प ७७ वर्षांचे आहेत. हेलेंच्या प्रचार पथकाने एक निवेदन जारी केले आहे की ट्रम्प म्हणतात की ते २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम आहेत, परंतु जर तसे असेल तर ते निक्की हेलेंशी वाद का करत नाहीत? बुजुर्ग नेत्यांना अवघड प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, हेच त्याचे कारण स्पष्ट आहे.
दक्षिण कॅरोलिनामध्ये निक्की हेले या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा २६ गुणांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रीय स्तरावरही निक्की हेले ट्रम्प यांच्यापेक्षा ५४ गुणांनी मागे आहे. विशेष म्हणजे जो बायडेन आणि निक्की हेले यांच्यात अध्यक्षीय निवडणुकीची लढत असेल तर निक्की हेले या बायडेनपेक्षा खूप पुढे आहेत.
त्यामुळे निक्की हेले आणि त्यांची प्रचार टीम वयाच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा लढत होऊ नये, अन्यथा हिंसाचार भडकू शकतो, असा प्रचारही ते करत आहेत. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या प्रचार पथकाचा दावा आहे की निक्की हेलेंकडे निधीची कमतरता आहे आणि त्या लवकरच निवडणुकीतून आपले नाव मागे घेणार आहे.