मुंबई – मुंबईतील चेंबूर परिसरात स्वयंपाकाच्या गॅस गळतीनंतर लागलेल्या आगीत चार महिलांसह नऊ जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. जखमींपैकी तीन जण ५० टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी रात्री ११.४५ च्या सुमारास चेंबूर पूर्व येथील सिद्धार्थ कॉलनी येथे एका चाळीत एलपीजी सिलिंडरची गळती झाली.अग्निशमन दलाने ही आग पंधरा मिनीटात आटोक्यात आणली. तथापि तत्पुर्वी या घटनेत १७ ते ६० वयोगटातील चार महिलांसह नऊ जण भाजले. त्यापैकी सहा जणांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर प्रत्येकी एकाला सायन रुग्णालयात, गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात आणि मानेक रुग्णालयात (चेंबूर) दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, ५० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या तीन जखमींची प्रकृती गंभीर आहे. पाच जणांची प्रकृती स्थिर आहे, तर किरकोळ जखमी झालेल्या 42 वर्षीय व्यक्तीला शताब्दी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.