न्यूयॉर्क : किमान 280 कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी एका 34 वर्षीय भारतीय व्यक्तीला अमेरिकेत सात वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत आणि सिंगापूरमधून अवैध तस्करी करून अमेरिकेला ओपिओइड्स (मादक औषध) पुरवल्याचा आरोप या व्यक्तीवर होता.
बोस्टनमधील फेडरल वकिलांनी एका निवेदनात म्हटले आहे की, दोषी मनीष कुमारने अमेरिकेतील लोकांना लाखो बेकायदेशीर आणि औषध अथवा आरोग्य विभागाची मंजूरी नसलेल्या गोळ्या पाठवल्या, आणि या गोळ्या घेण्यासाठी त्या लोकांकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नव्हते. कुमार यांना अमेरिकी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मार्क एल वुल्फ यांनी 87 महिने तुरुंगवास आणि तीन महिन्यांच्या देखरेखीखाली सोडण्याची शिक्षा सुनावली, असे निवेदनात म्हटले आहे. त्याला एक लाख अमेरिकी डॉलर्सचा दंड भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दोषी मनीष कुमारने भारतातील कॉल सेंटरमधून संभाव्य ग्राहकांना जाहिराती आणि कॉलद्वारे अमेरिकेत ड्रग्जचा पुरवठा केला. कुमार यांनी वैयक्तिकरित्या मॅसॅच्युसेट्स आणि सिंगापूर आणि भारतातील इतर राज्यांमधील औषध पुरवठादारांकडून माल पाठवला, असेही उघड झाले आहे.
सरकारी वकिलांनी सांगितले की, कुमारच्या ड्रग व्यवसायाने एकूण 280 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला आणि लाखो बेकायदेशीर आणि मंजूर नसलेल्या गोळ्या युनायटेड स्टेट्समधील लोकांना पाठवल्या ज्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शन नव्हते.