नवी दिल्ली – भारताच्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे. या कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत चर्चाही केली. यातून त्यांना दिलासा मिळेल असे जरी समोर आले नसले तरीही ठाकूर यांनी सिंग यांना येत्या 24 तासांत आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.
या बैठकीत कुस्तीपटूंनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मात्र, या बैठकीतून त्यांना ठोस असे कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे. केवळ सिंग व काही प्रशिक्षक आणि पदाधिकारी यांच्या राजीनाम्याने आमचे समाधान होणार नसून त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे, या आपल्या मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत. देशाची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
तसेच तिला समर्थन देण्यासाठी देशाचे अनेक कुस्तीपटू पुढे आले व त्यांनीही आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. जंतरमंतरवर या कुस्तीपटूंनी आंदोलनही सुरू केले होते. त्यातच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा व देशाच्या महान धावपटू पी. टी. उषा यांनीही या खेळाडूंनी कैफीयत मांडावी व योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली जाईल, असे म्हटले होते. दरम्यान, ठाकूर यांनी या कुस्तीपटूंना भेटीसाठी बोलावले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
या बैठकीनंतर ठाकूर यांनी सिंग यांना येत्या 24 तासांत महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर त्यांची हकालपट्टी होईल, असा इशाराही दिला आहे. कुस्तीपटू बबिता फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटू ठाकूर यांच्या बैठकीत उपस्थित होते.
ठोस कारवाई हवी
या बैठकीनंतरही कुस्तीपटूंनी सिंग यांच्याविरोधात सुरू झालेले आंदोलन संपणार नसल्याचे सांगितले. जोवर त्यांना पदावरून हटवले जात नाही व त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आमच्याकडे सिंग यांच्याविरोधात पुरावे आहेत. सरकारने जर कारवाई केली नाही तर आम्ही पोलिसांकडे जाऊ, असा इशाराही दिला आहे.