नवी दिल्ली – भारताच्या हॉकी संघाला नुकत्याच ओडीशात पार पडलेल्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत अपयश आले. संघाच्या या सुमार कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय संघाचे प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर त्यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने गेल्या चार वर्षांत चमकदार कामगिरी केली होती मात्र, केवळ विश्वकरंडकात अपयश आल्याने निराश होत रीड यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
विश्वकरंडक जिंकल्यानंतर शेफाली म्हणाली, “ही तर नव्या युगाची सुरूवात…”
यंदाची हॉकी विश्वकरंडक स्पर्धा भारताच्याच यजमानपदात ओडीशात पार पडली. मात्र, घरच्या मैदानावर खेळतानाही भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या रीड यांनी सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारली व भारतीय हॉकी महासंघाकडे राजीनामा सुपुर्द केला. इतकेच नव्हे तर त्यांच्यासह कामगिरी विश्लेषक ग्रेग क्लार्क व वैज्ञानिक सल्लागार डेव्हीड पेम्बरटन यांनीही आपले राजीनामे दिले आहेत.
रीड यांच्याच मार्गदर्शनाखाली 2019 सालापासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी उंचावली होती. भारताने तब्बल 41 वर्षांनंतर ऑलम्पिकमध्ये ब्रॉंझपदकही मिळवले होते. तसेच बर्मिंगहॅमला झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संघाने रजतपदक तर एफआयएच प्रो लीग स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले होते. त्यामुळे हॉकी महासंघाचे अध्यक्ष व माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू दीलीप तिर्की यांनीही रीड यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, रीड आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
Indian men’s hockey team head coach Graham Reid resigns after World Cup
Read @ANI Story | https://t.co/fjOe54aeyy#HockeyWorldCup #IndianMensHockeyTeam #HockeyIndia #GrahamReid pic.twitter.com/CQ2mXIqv3D
— ANI Digital (@ani_digital) January 30, 2023
भारतीय संघाने रीड यांच्याच कार्यकाळात गतवैभव परत मिळवण्याकडे योग्य वाटचाल केली होती. केवळ विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशाने रीड यांनी राजीनामा दिल्यामुळे आता भारतीय संघाला नव्याने प्रशिक्षक शोधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरस कामगिरी करावी लागणार आहे.