गुजरातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर समर्थकाने मोदींची सोन्याची मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 20 जण सलग तीन महिने मेहनत घेत होते. या मूर्तीचे वजन 156 ग्रॅम असून ती 18 कॅरेट सोन्यापासून बनवली आहे. मूर्ती बनविण्यासाठी 11 लाख रुपये खर्च आला असल्याचे सांगितले जात आहे.
गुजरातमधील विधनासभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाने प्रभावित होऊन बसंत बोहरा यांनी ही मूर्ती बनवली आहे. बोहरा हे सोनार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे ‘राधिका चेन्स’ नावाचे सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 182 पैकी 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या विजयाने प्रभावित होऊन बोहरा यांनी ही मूर्ती बनवल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ही मूर्ती विकत घेण्यासाठी अनेकांनी बोहरा यांच्याशी संपर्क साधला मात्र; मूर्ती विक्रीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बोहरा यांनी सांगितले आहे. या मूर्तीचे फोटो आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.