वॉशिंग्टन- कोणत्याही देशाचा किंवा प्रदेशाचा इतिहास हा नेहमीच एक वादग्रस्त विषय असू शकतो. त्यातही तरुण पिढीला या इतिहासापेक्षा आपल्या भविष्यामध्ये जास्त रस असतो. पण अमेरिकेतील एक भारतीय वंशाची मुलगी मात्र अमेरिकेच्या इतिहासात दुरुस्ती करण्यासाठी धडपडत आहे.
अमेरिकेच्या इतिहासामध्ये कृष्णवर्णीय महिलांना योग्य स्थान दिले जात नसल्याचा भावनेतूनच तिने हे प्रयत्न सुरू केले असून तिच्या या प्रयत्नांना यश मिळणार असून अमेरिकेच्या इतिहासात आता कृष्णवर्णीय महिलांच्या योगदानाला योग्य स्थान दिले जाणार आहे.
प्रसिधा पद्मनाभन असे या मुलीचे नाव असून ती फक्त 17 वर्षाची आहे. मूळची तामिळनाडूतील असलेली प्रसिधा जन्मापासूनच अमेरिकेत आहे. शाळेमध्ये तिला इतिहास शिकवला जात असताना त्यामध्ये कृष्णवर्णीय महिलांचे अमेरिकेमधील योगदानाबाबत कोणताच उल्लेख नव्हता किंवा खूप कमी प्रमाणात उल्लेख केलेला आढळतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रसिधाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यानंतर तिने अमेरिकेतील कृष्णवर्णीय महिलांच्या इतिहासातील योगदानाला सन्मान मिळवून देण्यासाठी धडपड सुरू केली.
महामारीच्या कालावधीमध्ये तिने विमेन फोर एज्युकेशन अडवोकॅसी अँड राइट्स या नावाच्या एक एनजीओची स्थापना केली. एनजीओच्या माध्यमातून तिने एक याचिका दाखल करून अमेरिकेच्या इतिहासात कृष्णवर्णीय महिलांच्या योगदानाला योग्य स्थान देण्याची मागणी केली. आपल्या स्वतःच्या वेबसाइटवर सुद्धा ही चळवळ सुरू केली.
प्रारंभी तिच्या या चळवळीवर टीका पण झाली. अमेरिकेच्या इतिहासात महिलांचे योगदानाला तेवढे महत्व देण्याची गरज नाही, अशा प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रियाही तिला ऐकायला मिळाल्या पण तिने धीर सोडला नाही. त्यामुळे तिने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्या याचिकेवर आता पाच हजार लोकांनी सह्या केल्या आहेत. या प्रयत्नांची दखल घेऊन अमेरिकेतील काही कौंटी स्कूलनी आपण जो इतिहास शिकवत आहोत त्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या प्रयत्नाची दखल घेण्यात आली असून या सात महिलांना योग्य स्थान दिले जाईल, अशी ग्वाही तिला देण्यात आली आहे. प्रसिधाच्या अमेरिकेतील या धडपडीचा परिणाम ब्रिटनमध्ये सुद्धा झाला असून ब्रिटनमध्ये सुद्धा आता इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कृष्णवर्णीय व्यक्तींच्या योगदानाची माहिती दिली जाणार आहे.