अयोध्या – अयोध्या येथील राममंदिर उभारणीच्या दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या गर्भगृह उभारणीचे काम सुरू होणार असून त्या कामाचा रितसर पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी तेथील कामाची पाहणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष मंदिराच्या गर्भगृह उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
हा एक महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे प्रत्यक्ष मंदिर साकारण्याचे उद्दिष्ट आता जवळ आले आहे याचा रामभक्तांना निश्चितच आनंद होणार आहे. त्यामुळे आजच्या या गर्भगृह पायाभरणीला विशेष महत्त्व आहे, असे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्येत आधीच आगमन झाले आहे.