आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा : सपना, शुभांगी व रविना यांची निवड

भारतीय फुटबॉल संघ जाहीर

पुणे – कार्डिफमध्ये 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या वंचित व बेघर खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय मुलींच्या संघात महाराष्ट्राच्या सपना जैस्वार, शुभांगी भंडारे व रवीना सूर्यवंशी यांची निवड झाली आहे.

कार्डिफमधील ब्युट पार्कमध्ये 3 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 50 देशांतील 500 खेळाडू भाग घेत आहेत. महाराष्ट्रातील या तिघी देशभरातील वंचित पार्श्‍वभूमीतून आलेल्या आणखी 13 फुटबॉलपटूंच्या साथीने भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. होमलेस वर्ल्ड कप फाऊंडेशन या फुटबॉलच्या माध्यमातून बेघर अवस्था संपवण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

सपनाने सांगितले की, मी सध्या मुंबईत राहते पण माझे कुटुंब पुण्याजवळच्या एका खेड्यातील आहे. मी लहान असताना माझा मोठा भाऊ वारला आणि वडील दारूच्या आहारी गेले. त्यांनी काम सोडले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत खडतर काळ होता. मी संघर्ष करत राहिले आणि आमच्या समुदायात फुटबॉल खेळू लागले. त्यानंतर मी घरापासून दूर येऊन एका छोट्या क्‍लबसाठी फुटबॉल खेळू लागले. होमलेस वर्ल्डकपसाठी माझी निवड होणे ही एक मोठी संधी आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणार या कल्पनेने मी थरारून गेले आहे.

अहमदनगरमधील शुभांगी म्हणाली, माझे वडील वडापाव विक्रेते आहेत आणि माझी आई अहमदनगरमधील एका हॉटेलमध्ये पोळ्या लाटण्याचे काम करते. आम्ही झोपडपट्टीत राहतो आणि माझे आई-वडील उपजीविकेसाठी खूप कष्ट करतात. मी 13 वर्षांची होते तेव्हा फुटबॉल खेळणे सुरू केले. मी स्लम सॉकरतर्फे नागपूर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला.

रवीना म्हणाली, मी नागपूरमध्ये माझे आई-वडील आणि 3 भावंडांसोबत राहते. माध्यमिक शाळेत असताना माझ्या मित्रमंडळींसोबत फुटबॉल खेळणे सुरू केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)