शांघाय – प्रशिक्षका विना खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले आहे. तर, प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले.
यावेळी प्रवीणने 704 गुणांची कमाई केली. यानंतर लवज्योत आणि गुरविंदर यांच्या सोबतीने प्रवीणने भारतीय संघासाठी 2091 गुणांची कमाई करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारताची पुढील फेरीत गाठ 13 व्या रॅंकिंगवर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पडेल.
महिला कंपाऊंड प्रकारात परविना 20 व्या स्थानी आली. मोनाली जाधव आणि प्रिया गुर्जर यांना अनुक्रमे 24 आणि 25 वे स्थान मिळाले. या तिघींचा भारतीय संघ पात्रता फेरीत सहाव्या स्थानी राहिला. मुख्य फेरीत भारतीय महिला संघाला 11 व्या स्थानावरील सिंगापूरविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारतीय संघासोबत कंपाऊंड प्रकारात कुठलाही कोच गेलेला नाही.