Budget 2024 : नुकताच जाहीर झालेला भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरीडॉर हा भारत आणि इतरांसाठीही धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारा असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. हा कॉरीडॉर येत्या शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा पाया ठरेल. कोविड-19 महामारी नंतर नवी जागतिक रचना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
2014-23 या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 596 अब्ज डॉलर्स इतका राहिल्याचे सांगून हे परकीय गुंतवणुकीचे सुवर्णयुग असल्याचे त्यांनी सांगितले. ही गुंतवणूक, 2005-14 या काळातल्या परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे त्यांनी ठळक केले. ‘आधी भारताचा विकास’ या भावनेने,सातत्यपूर्ण विदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आपल्या परदेशी भागीदारांसमवेत द्विपक्षीय गुंतवणूक करारांवर वाटाघाटी करत असल्याचेही त्यांनी 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
सौर ऊर्जा प्रणाली
‘रूफटॉप सोलरायझेशन’ अर्थात छतावरील सौर ऊर्जा प्रणालीच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल. ही योजना अयोध्येतील राममंदिरामधील प्रतिष्ठापना सोहळ्याच्या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधानांनी केलेल्या संकल्पाला अनुसरून आहे. या मोफत सौरऊर्जेमुळे प्रत्येक कुटुंबाची वार्षिक पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतची बचत आणि अतिरिक्त विजेची वितरण कंपन्यांना विक्री करता येणार आहे.
हरित ऊर्जा
2070 पर्यंत ‘नेट-झिरो’ची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या उद्देशाने 2030 पर्यंत 100 मेट्रिक टन इतकी कोळसा गॅसिफिकेशन आणि द्रवीकरण क्षमता स्थापित केली जाईल. यामुळे नैसर्गिक वायू, मिथेनॉल आणि अमोनियाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी व्हायला मदत होईल. तसेच दळणवळणासाठी कॉम्प्रेस्ड नैसर्गिक वायू (सीएनजी) मध्ये कॉम्प्रेस्ड जैव वायूचे (सीबीजी) आणि घरगुती वापरासाठी पाइप्ड नैसर्गिक वायूचे (पीएनजी) टप्प्याटप्प्याने मिश्रण करणे, अनिवार्य केले जाईल.