मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू व माजी कसोटीपटू इरफान पठाणने तडाखेबंद खेळी करत श्रीलंका लिजंड संघाचा पराभव करत रोट सेफ्टी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंडियन लिजंड संघाचा विजय साकार केला.
श्रीलंका लिजंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 138 धावा केल्या. विजयासाठी 139 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग लवकर परतले. सचिनला भोपळाही फोडता आला नाही. सचिनला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वासने यष्टीरक्षक कालुवितरणाकरवी झेलबाद केले.
Thinking of… #love #playing #cricket pic.twitter.com/dEUy7Hh9Yb
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 12, 2020
सचिन परतल्यानंतर सेहवागही केवळ 3 धावा काढून तंबूत परतला. अष्टपैलू युवराज सिंग देखील बाद झाला. त्यावेळी इंडियन लिजंड संघाची 3 बाद 19 अशी बिकट झाली होती. त्यानंतर संजय बांगर व महंमद कैफ यांनी संघाचा डाव सावरला. बांगरही परतला तर, कैफही 46 धावांवर बाद झाला. त्या वेळी इंडियन लिजंड संघाच्या 5 बाद 81 धावा होत्या.
त्यानंतर मात्र, इरफान पठाणने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आक्रमक फलंदाजी केली. पठाणला मनप्रीत गोनीने सुरेख साथ देत संघाचा विजय साकार केला. पठाणने केवळ 31 चेंडूत 57 धावा फटकावल्या व श्रीलंकेच्या हातात असलेला विजय खेचून आणला.