#ENGvIND : कोहलीच्या संघाची आजपासून कसोटी

नॉटिंगहॅम – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून यजमान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आजवर भारताने केलेल्या दौऱ्यात अपयश आलेला भारतीय संघ यंदा चोकर्स ही ओळख पुसून काढण्यात यशस्वी होणार का हाच मुख्य प्रश्‍न आहे.

गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्येच झालेल्या आयसीसीच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर भारतीय संघ 20 दिवसांच्या सुट्टीवर होता. त्यातच विम्बल्डन तसेच युरो करंडक फुटबॉल स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी भारतीय संघातील काही खेळाडू उपस्थित होते.

त्यातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला करोनाची बाधा झाली होती. त्याच्यासह काही खेळाडूंना विलगीकरणातही राहावे लागले होते. त्यानंतर हे खेळाडू पूर्ण फिट ठरल्याने तसेच त्यांच्यासह संघातील सर्व खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांनी सराव सुरू केला होता. तसेच या सरावादरम्यान काउंटी संघांशी सराव सामनेही खेळले. त्यात लोकेश राहुलने फलंदाजीचा सराव करत शानदार शतकी खेळी केली व भारतीय संघात पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंत स्थान मिळवण्याची शक्‍यताही निर्माण केली.

सलामीवीर रोहित शर्मा, कर्णधार कोहली, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अशी तगडी फलंदाजी यजमान संघाला कसे आव्हान देणार यावरच सामन्याचा निकाल अवलंबून आहे. वेगवान गोलंदाजांत जसप्रीत बुमराह, महंमद शमी यांची निवड निश्‍चित मानली जात आहे.

फिरकी गोलंदाजात कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा याच्या निवडीवरून प्रचंड टीका झाली असल्याने केवळ रवीचंद्रन अश्‍विनचीच निवड होणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

इंग्लंडचा संघ कर्णधार ज्यो रूटच्या नेतृत्वाखाली समतोल वाटत आहे. गोलंदाजीतही मुख्य अस्त्र जेम्स अँडरसन हाच त्यांचा हुकमी एक्‍का असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.