नवी दिल्ली – सध्या जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर कोसळले आहेत. अशा परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भारताने या कालावधीत 3 कोटी 20 लाख टन एवढे क्रूड आपल्या विविध साठवणुक केंद्रात साठविले आहे.
याचा फायदा आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला होऊ शकेल असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. भारत जगामध्ये क्रूडची आयात करणारा सर्वात मोठा तिसरा देश आहे. भारतात जास्त प्रमाणात क्रूड निर्माण होत नसल्यामुळे भारताला आपल्या गरजेच्या 85 टक्के इतके क्रूड आयात करावे लागते. प्रधान यांनी सांगितले की, करोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात क्रूडची मागणी कमी झाल्यामुळे क्रुडचे दर कोसळले आहेत.
भारताने सध्याच्या परिस्थितीत कमी दरावर मोठ्या प्रमाणात क्रुड खरेदी करून ते साठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फायदा आगामी काळता भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे. त्याचबरोबर यामुळे मोठ्या प्रमाणता परकीय चलन वाचणार आहे.- धमेंद्र प्रधान , केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री
या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी भारताने या काळात कमी दरावर क्रूडची खरेदी वाढविली आहे. भारताने सर्व साठवणूक केंद्रे पूर्णपणे भरण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराक यांच्याकडून क्रूडची खरेदी करतो. भारताने सध्या साठवलेला क्रुडचा साठा आपल्या गरजेच्या 20 टक्के इतका आहे.
त्यामुळे भारताला आगामी काळामध्ये या कमी दरावरील क्रुडचा वापर करता येणार असल्याचे ते म्हणाले. भारताला याअगोदर महाग क्रूड खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा वापर करावा लागत होता. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताचे परकीय चलन वाचले आहे.
सध्या जागतिक बाजारात क्रूडचे दर केवळ 20 टक्के डॉलर प्रति पिंप असे आहेत. मात्र जागतिक बाजारात क्रूडचे दर कोसळले असले तरी त्याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना होण्याची शक्यता कमी आहे. कारण सरकारचा महसूल कमी झालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार देशांतर्गत इंधन दर जागतिक दराच्या तुलनेत कमी करण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांना वाटते.