लोकांच्या हातात जादा पैसे देण्याची अभिजीत बॅनर्जी यांची सुचना

नवी दिल्ली: करोनाच्या लॉकडाऊन मुळे भारताचे अर्थचक्र पुर्ण थांबले आहे. अशा स्थितीत या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर तळातील 60 टक्के लोकांच्या हातात जादा पैसे देणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे अशी सुचना नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी साधलेल्या संवादाच्यावेळी त्यांनी ही सुचना केली आहे.

ते म्हणाले की बाजारात आज पैसा नाही. हा पैसा खेळता ठेवण्यासाठी लोकांच्या हातात पैसे दिले पाहिजेत. तरच ते खर्च करायला सुरूवात करतील आणि यातून अर्थचक्राला गती देता येईल. अमेरिकेसारख्या देशांनी त्यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्के इतका पैसा लोकांना पॅकेज म्हणून दिला आहे. अनेक युरोपिय देशांनीही हाच मार्ग अनुसरला आहे. भारतालाहीं त्यांचेच अनुकरण करावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

भारतात अन्नधान्याचा साठा पुरेसा आहे. पण तो गरजुंपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे की रेशन कार्ड नसलेल्यांनाहीं हा साठा पुरवला पाहिजे. त्यासाठी तात्पुरत्या रेशन कार्डाची सोय करणे किंवा आधार कार्डावर रेशन देणे असे उपाय योजले पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे. अशा स्वरूपाच योग्य निर्णय भारत सरकारने घेतले तर आर्थिक गाडे रूळावर येऊ शकते असे त्यांनी नमूद केले.

सरकारने लघु व मध्यम उद्योगांना पॅकेज देण्याची तयारी दर्शवली आहे, पण तो पर्याय कुचकामी ठरेल असे मत व्यक्त करून ते म्हणाले की सरकारी पॅकेजमुळे हे उद्योग उत्पादन सुरू करतील पण त्यांची उत्पादने खरेदी कोण करणार? कारण आज बाजारात खरेदीदारच नाही. त्यामुळे आधी खरेदीदार तयार करावे लागतील त्यामुळे उद्योगांना पैसे देण्या ऐवजी लोकांना पैसे दिले तर ते खरेदी सुरू करतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी अर्थतज्ज्ञांशी जाहीर चर्चा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या उपक्रमातील हा दुसरा संवाद होता. या आधी त्यांनी रघुराम राजन यांच्याशी असा जाहीर संवाद साधला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.