नवी दिल्ली – भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण व क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा पराभव करत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर, भारताचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. 70 टक्के विजयाच्या गणिताच्या जोरावर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे.
इंग्लंड संघाने 11 विजय व चार पराभव स्वीकारले आहेत. तर तीन सामने अनिर्णीत राखले आहेत. इंग्लंड संघाच्या नावावर 442 रेटिंग पॉईंट असून त्यांची विजयाची टक्केवारी 70.2 इतकी आहे.
भारतीय संघाने 9 विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना अनिर्णीत राखला आहे. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 68.3 इतकी आहे.
अजूनही संधी कायम
ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा न्यूझीलंडला झाला. न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना समान संधी आहे.