मुंबई: भारताच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी ओमान ज्युनियर, कॅडेट ओपन स्पर्धेत सुवर्ण, रौप्यपदकांसह सात पदकांची कमाई करत आपली छाप पाडली. मस्कत येथे झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ब संघाने कॅडेट मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवले. काव्या श्री भास्कर व निलिष्मा सरकार यांनी चीन तैपेई वन संघाला नमवित बाजी मारली.
काव्या श्री याने आपले दोन्ही एकेरीचे सामने जिंकले. चौथ्या सामन्यात तिने 3-1 असा विजय मिळवला. चीन तैपेईकडून पु स्युअन चेंग व युआन टिंग लिआंग यांनी संघाचे नेतृत्व केले. भारताच्या अ संघात तनिशा एस. कोटेचा व सुहाना सैनी यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या कॅडेट गटात भारताच्या दोन्ही संघांना उपांत्यफेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आदर्श ओम छेत्री व दिव्यांश श्रीवास्तव यांचा सहभाग असलेल्या भारताच्या अ संघाला चीन तैपेई 1 कडून 0-3 असे तर, राज प्रेयेश सुरेश आणि सार्थ मिश्रा यांना देखील पराभूत व्हावे लागले. मुलींच्या ज्युनियर गटातील राउंड रॉबिन गटात स्वस्तिका घोष व अनारग्या मंजुनाथ कुटुंबले सात गुणांसह दुसरे स्थान मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.
त्यांनी चार सामन्यामध्ये तीन विजय मिळवले. त्यांना चीन तैपेईकडून 2-3 असे पराभूत व्हावे लागले. भारताच्या ब संघाने मूनमून कुंडू व अनुषा कुटुंबले यांनी चार सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला. एकूण सहा गुणांसह त्यांनी कांस्यपदक पटकावले. श्रेयांश गोयल व हिमनाकुलपुइंघेता जेहो यांचा सहभाग असलेल्या भारताच्या ब संघाला 1-3 असे पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.