नवी दिल्ली: पॅनगॉंग लेक भागात चीनशी सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात रस्ते उभारणीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. भारत आणि चीनमध्ये संघर्षाचा पॅनगॉंग लेक हा मुख्य केंद्रबिंदू आहे.
लुकुंग आणि फोब्रांगदरम्यानचा 15 किमीचा रस्ता उभारून पूर्ण केला आहे. त्यामुळे पॅनगॉंग भागात लष्कराचे वेगाने दळणवळण शक्य होणार आहे. फोब्रांग भागातून हॉटस्प्रिंग भागात जाण्यासाठी रस्ते उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. हॉटस्प्रिंग भाग चीनच्या सीमेलगतचा प्रदेश आहे. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लुकुंग भागाला भेट देऊन जवानांशी संवाद साधला होता.
स्पॅंगमिक आणि खाकतेत दरम्यान रस्ता उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पॅनगॉंग लेक परिसरातील मान आणि मरक या गावांना जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
खाकतेत धबधब्याच्या समोरील भागात फिंगर तीन आणि चार हे भाग येतात. तेथे गेल्या दोन महिन्यांत दोन्ही देशांनी आपापल्या बाजूने मोठी बांधकामे केली आहेत. खाकतेत ते चुशुलदरम्यानही रस्त्याचे काम वेगात सुरू आहे.
गलवान खोऱ्यात आणि पॅनगॉंग लेक परिसरातील सीमावर्ती भागात स्थानिकांना मजूर म्हणून घेत, या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे, असे लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेचे कार्यकारी समुपदेशक कोनचोक स्टॅन्झिन यांनी सांगितले.
केवळ रस्तेच नव्हे तर 30 पुलांचे बांधकामही सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष ताबारेषेवर दळणवळण सोयीचे होणार आहे. ताबारेषेवर असणारा तणाव पाहता, पूर्व लडाखशी संपर्क हा प्राधान्याचा विषय आहे. त्यसाठी चेंगथांग भागात दुरबूक आणि नियोमा हे दोन उपविभाग निर्माण करण्यात आले आहेत. ते रस्ते निर्माणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या दोन उपविभागात चुशुल, शीओक, डेमचोक, गलवान आणि चिमुर हे संवेदनशील भाग येतात.