Asia Cup 2023 – भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून द्विपक्षीय मालिका खेळलेल्या जात नाहीत. त्यामुळे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने येतात. क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची लाखो क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकता लागलेली असते. दरम्यान, आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठीच्या सामन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघाना एकाच गटात ठेवण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकात दोन्ही संघात सामना झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने रोमांचक विजय मिळवला होता.
त्याचबरोबर मागील आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनवेळा लढत झाली. यामध्ये पहिला सामना भारताने तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली होती. भारतीय संघाला या आशिया चषक स्पर्धेमध्ये अपयश आले होते. मात्र, सर्वात कमजोर समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद जिंकले होते. अगोदर आशिया चषक आणि नंतर टी-२० विश्वचषकात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता आगामी काळातील स्पर्धांसाठी बीसीसीआयने धाडसी निर्णयदेखील घेतले आहेत.
आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमान पद यावेळी पाकिस्तानकडे आहे. परंतु, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी गेल्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल असे सांगितले होते. त्याचबरोबर टीम इंडिया क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान जाणार नाहीया अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली होती. शाह यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विरोध केला होता. त्यानंतर आशिया चषक स्पर्धा कुठे खेळवली जाईल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता ही स्पर्धा कुठे खेळवली जाणार हे महत्वाचे ठरणार आहे.
एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होणार स्पर्धा
शेवटची आशिया चषक स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली गेली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होईल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया चषक स्पर्धेचा फॉर्मेट बदलण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.