भारत ‘अ’ संघाची बाजू बळकट
तरौबा, वेस्ट इंडिज – शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक व कर्णधार हनुमा विहारीचे तडाखेबाज शतक याच्या जोरावर भारत “अ’ संघास वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्धच्या तिसऱ्या अनधिकृत क्रिकेट कसोटीत आपली बाजू बळकट करता आली. तिसऱ्या दिवसअखेर विजयासाठी 373 धावांचा पाठलाग करताना विंडीजने दुसऱ्या डावात बिनबाद 37 धावा केल्या.
भारताने 3 बाद 23 धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र शहबाज नदीम (13) याची विकेट त्यांनी झटपट गमावली. भारताची त्यावेळी 4 बाद 50 अशी स्थिती होती. भारतीय संघ 150 धावांमध्ये गुंडाळला जाणार काय असे चित्र होते. मात्र गिल व विहारी यांनी आत्मविश्वासाला आक्रमकतेची जोड देत संघाचा डाव सावरला. एवढेच नव्हे त्यांनी संघास आव्हानात्मक धावसंख्या रचण्यासही मदत केली. ही जोडी फोडण्यासाठी विंडीजकडून अनेक वेळा गोलंदाजीत बदल करण्यात आले. तथापि त्यास दाद न देता त्यांनी आकर्षक खेळ करीत पाचव्या विकेटसाठी 73.5 षटकांत 315 धावांची अखंडित भागीदारी केली.
गिलने प्रथम दर्जाच्या सामन्यात भारताकडून द्विशतक टोलविणारा सर्वात तरूण खेळाडू होण्याचा मान मिळविला. यापूर्वी गौतम गंभीरने 2002 मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध अध्यक्षीय संघाकडून द्विशतक केले होते. त्यावेळी त्याचे वय 20 वर्षे 124 दिवस होते. गिलने द्विशतक केले त्यावेळी तो 19 वर्षे 334 दिवसांचा होता. त्याने 248 चेंडूंमध्ये 19 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 204 धावा केल्या. विहारीने गिलला सुरेख साथ देताना 221 चेंडूंमध्ये नाबाद 118 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 10 चौकाराबरोबरच एक षटकारही ठोकला. भारताने 4 बाद 365 धावा करीत डाव घोषित केला. उर्वरित खेळांत विंडीजने बिनबाद 37 धावा केल्या. हा सामना चार दिवसांचा आहे.
संक्षिप्त धावफलक -भारत “अ’ 201 व 4 बाद 365 घोषित (शुभमन गिल नाबाद 204, हनुमा विहारी नाबाद 118, केमार होल्डर 2-88) वेस्ट इंडिज “अ’ 194 व 15 षटकांत बिनबाद 37 (मॉंटेसिन हॉज नाबाद 15, जेरेमी सोलोझानो नाबाद 20)