World Cup 2023 India vs Pakistan (Ahmedabad) – नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अहमदाबाद क्राइम ब्रँचने अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ईमेल पाठवून ही धमकी दिली होती. करण मावी असे आरोपीचे नाव आहे. त्याला राजकोट येथून अटक करण्यात आली.
काही दिवसापूर्वी, बीसीसीआयला धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. आरोपीने त्यात लिहिले होते की 14 ऑक्टोबर 2023 रोजी मोटेरा परिसरात असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्फोट होईल, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती हादरेल. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, तो मूळचा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी आहे.
आरोपी मावीला यापूर्वी 2018 मध्ये बलात्कार, मानवी तस्करी आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी धार येथील धामनोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
दरम्यान, याबाबत इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. 29 सप्टेंबर रोजी गुजरात पोलिसांनी धमक्या दिल्याबद्दल प्रतिबंधित संघटनेचे शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता.