पिंपरी – एका दिवसात करोडपती झालेले पिंपरी चिंचवडच्या “त्या’ फौजदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्या फौजदाराने एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींची रक्कम जिंकली. त्याबाबत आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस फौजदार सोमनाथ झेंडे यांना एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींचे बक्षीस मिळाले. त्यानंतर याबाबत साधक बाधक चर्चा सुरू झाली. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी अशा प्रकारे पैसे लाऊन खेळ खेळला असल्याने त्याबाबत काही जणांनी त्यावर आक्षेप घेतले.
आता या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडून झेंडे यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाच्या प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली.
“ऑनलाइन जुगारापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासनाकडून उपक्रम राबविले जात असताना फौजदार सोमनाथ झेंडे हे कर्तव्यावर जुगार खेळले. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. यातून लहान मुलांना ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.” – अमोल थोरात माजी सरचिटणीस भाजप